लक्ष्मीकांत बेर्डे यांना अशा प्रकारे मिळाला होता “धुमधडाका” चित्रपट, त्यांनी त्यावेळी घेतलेले मानधन ऐकून तुम्हीही व्हाल चकित…

अनेक दशके अवघ्या महाराष्ट्राला पोटभरुन हसविणारा अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे उर्फ लक्ष्या याची आज 66 वी जयंती आहे. 3 नोव्हेंबर 1954 साली जन्मलेल्या लक्ष्याने 16 डिसेंबर 2004 साली सर्व जगाचा निरोप घेतला व मराठी सिनेइंडस्ट्रीला पार पोरकं करून टाकले. मात्र त्याने साकारलेल्या अनेक भूमिका प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आजही घर करून कायम आहेत.
आपल्या सर्वांना माहीतच आहे की महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे ही जोडी एकेकाळी मराठी सिनेइंडस्ट्रीत सर्वांत लोकप्रिय जोडी होती. तसेच अशोक सराफ यांनी देखील लक्ष्मीकांत बेर्डे यांचेसोबत चांगलीच साथ दिली होती. परंतु महेश कोठारे यांचेसोबत लक्ष्मीकांत बेर्डे यांची जोडी चांगलीच प्रसिद्ध झाली होती. आजही या दोघांचे चित्रपट प्रेक्षक अगदी त्याच आवडीने बघतात.
पण या दोघांचा एक किस्सा फारच कमी लोकांना माहित आहे. तो म्हणजे लक्ष्याने महेशच्या एका चित्रपटासाठी अवघे एक रुपये मानधन घेतले होते. त्यावेळी हिंदी चित्रपट ”प्यार किये जा” चा मराठीत रिमेक महेशला करायचा होता. सर्व पात्रांची निवड झाली होती पण मेहमूद सारख्या हरहुन्नरी कलाकारासाठी त्याला योग्य व्यक्ती मिळत नव्हता.
त्यावेळी महेश कोठारेंच्या आई आणि वडिलांचं नाटक सुरु होते. ”झोपी गेलेला जागा झाला” या नाटकाचे तेव्हा हजारो प्रयोग झाले होते. पण नाटकातील कलाकार बबन प्रभुणे यांचे काही कारणास्तव दुःखद निधन झाले आणि त्यांच्या जागी त्या नाटकात लक्ष्याची निवड करण्यात आली. महेशने जेव्हा हे लक्ष्याचे नाटक पाहिले तेव्हा त्याला लक्ष्याची भूमिका इतकी आवडली की त्याने मेहमूदच्या भूमिकेसाठी लक्ष्याची निवड केली.
महेशचा दिग्दर्शनाचा तेव्हा हा पहिलाच चित्रपट होता त्यामुळे महेशकडे सुद्धा या चित्रपटासाठी पुरेसे पैसे नव्हते. त्यावेळी त्याने लक्ष्यासोबत या चित्रपटा संदर्भात चर्चा केली आणि आपल्या परिस्थितीची जाणीव त्याला करून दिली आणि चित्रपटासाठी त्याचा होकार सुद्धा मिळवला. महेशने लगेचच खुश होऊन खिशातून एक रुपया काढला आणि लक्ष्याला दिला. होय त्या फक्त एका रुपयातच लक्ष्याने हा चित्रपट केला आणि त्या चित्रपटाचे नाव होते धुमधडाका.
या चित्रपटामधून लक्ष्यालाही मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली. त्यानंतरच्या महेशचा अनेक चित्रपटांमध्ये लक्ष्याने काम केले. महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनी एकत्र झपाटलेला, माझा छकुला, धांगडधिंगा, पछाडलेला असे एकापेक्षा एक दमदार चित्रपट केले. जे चित्रपट आजही लोकांच्या मनात तितकेच लोकप्रिय आहेत.