‘तो नसता तर मी नसते’; ‘या’ मराठी अभिनेत्यामुळं एकता कपूर झाली TV Queen…

बालाजी टेलिफिल्मची सर्वेसर्वा एकता कपूर हिनं आजवर अनेक नवोदीत कलाकारांची करिअर घडवली आहेत. त्यामुळं तिला टीव्ही इंडस्ट्रीमधील ‘गॉडमदर’ असंही म्हटलं जातं. परंतु तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल तिचं करिअर एका मराठी अभिनेत्यामुळं घडलं होतं. एकता आज यशाच्या शिखरावर आहे.
टीव्हीच नव्हे तर वेब सीरिजमध्ये देखील ती घवघवीत यश मिळवत आहे. परंतु याची सुरुवात झाली होती ती एका मराठी अभिनेत्यामुळं. या अभिनेत्यामुळंच एकताच्या मालिकेत निर्मात्यांनी पैसे गुंतवण्यास सुरुवात केली. अन् आज ती स्वत:च एक नामांकित निर्माती म्हणून ओळखली जाते.
एकतानं 1995 साली ‘पडोसन’ या मालिकेतून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. या मालिकेला फारसं यश मिळालं नाही. पण मग तिनं ‘कॅप्टन हाऊस’ आणि ‘मानो या ना मानो’ अशा आणखी दोन मालिका तयार केल्या. या दोन्ही मालिका फसल्या. सलग तीन फ्लॉप मालिका दिल्यामुळं कोणताच निर्माता तिच्यावर पैसे गुंतवायला तयार नव्हता.
वडील जितेंद्र यांनी देखील निर्मितीचा नाद सोड आणि अभिनय वगैरे कर असा सल्ला तिला दिला होता. परंतु एकतानं हार मानली नाही. तिनं 1995 मध्येच एक विनोदी मालिका तयार करण्याचा निर्णय घेतला. अन् त्यावेळी मराठी सुपरस्टार अशोक सराफ यांनी तिची मदत केली.
एकतानं ‘हम पांच’ नावाची मालिका तयार केली. या मालिकेत अशोक सराफ यांनी मुख्य व्यक्तिरेखा साकारली होती. पाच मुली, अन् पाचही वेगवेगळ्या प्रवृत्तीच्या. अन् त्यामुळं वैतागलेला बाप असं या मालिकेचं स्वरुप होतं. अशोक सराफ यांची लोकप्रियता आणि धम्माल विनोद करण्याची शैली यामुळं ‘हम पांच’ सुपरहिट ठरली.
अनेकदा मालिकेतील संभाषण हे सुमार दर्जाचं असायचं परंतु अशोक सराफ यांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर त्याचं विनोदात रुपांतर केलं. असं स्वत: एकता कपूरनं एका मुलाखतीत सांगितलं होतं. हम पांच मालिका गाजल्यामुळं एकताकडे पुरेसे पैसे आले. दिग्दर्शक म्हणून तिच्यावर पैसे गुंतवण्यास निर्माते तयार झाले.
अन् त्यानंतर मात्र एकतानं मागे वळून पाहिलं नाही. ‘क्योकी सास भी कभी बहु थी’, कुसुम, कहानी घर घर की, कसौटी जिंदगी की, बडे अच्छे लगते है यांसारख्या एकामागून एक सलग सुपरहिट मालिकांची निर्मिती ती करत गेली. अन् आज ती टीव्ही इंडस्ट्रीमधील सर्वात अनुभवी आणि यशस्वी निर्माती म्हणून ओळखली जाते. परंतु या यशाची सुरुवात अशोक सराफ या मराठी अभिनेत्यामुळं झाली होती.